ऐकावे जनाचे करावे मनाचे

 
        
ऐकावे जनाचे करावे मनाचे, listen yourself
ऐकावे जनाचे करावे मनाचे 

लोकांनी कायम कोणाचे कौतुक केल्याचा इतिहास नाही.  एखाद्याचा एखाद्या ठिकाणी सन्मान व्हावा आणि काही दिवसांनी परतून तो त्याच जागी आला, तर त्याला कोणीही ओळखत नाही. नेपोलियन विजयी झाला. लोक त्याच्या प्रासादासमोर त्याचं अभिनंदन करण्यासाठी जमा झाले. नेपोलियन त्यांना सामोरा गेला नाही. तो म्हणाला, 'जे आज माझ्या अभिनंदनासाठी जमलेत, तेच उद्या मला सुळावर चढवतील.' दुर्दैवाने नेपोलियनचे शब्द त्याच्याच बाबतीत खरे ठरले. तुमचा पराभव वा विजय हा लोकांच्या दृष्टीने क्षणिक असतो. काल तुम्ही भले एखाद्या पेपरच्या पहिल्या पानावर झळकले असाल, आज तो रद्दी असतो. सगळा क्षणाचा खेळ.
        कोणी घर बांधायला काढो वा लग्न, न विचारता हजारो सल्ले मिळतील. ज्यांचा सल्ला तुम्ही ऐकला नाही, ते तुमची टर उडवतील. प्रत्येक बाबतीत तुम्ही काय करावं, या विषयी लोकांचं काहीतरी मत असतं. प्रत्येकाचं ऐकायचं म्हटलं, तर तुम्हाला जगताच येणार नाही. उलट तुमचा गोंधळ उडेल. आमचे तुकोबाराय म्हणतात, बहुतांची मते गोवा। जीव होऊ न द्यावा॥ एकदा तुम्ही यात गुरफटले की, पुढचा मार्ग अधिकच धूसर होतो. त्यामुळे बिनकामाच्या लोकमताकडे दुर्लक्ष करायला शिका. लोक सगळ्याच बाबतीत  एक्स्पर्ट नसतात. फक्त मिळेल तिथे आपल्या मताची पिचकारी मारीत असतात. तुम्हाला एखादा आजार झाला, तर तुम्ही लोकांचा सल्ला घेत नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेता. जिथे  विशेष ज्ञानाचा प्रश्न येतो, तिथे बहुमत कामाला येत नाही. तुका म्हणे येथ पाहिजे जातीचे।
      लोकांची टीका, सल्ले किंवा स्तुती फारशी मनावर घेऊ नका. बोलणाऱ्याची  लायकी काय, याचा विचार करा. ज्यांनी आयुष्यात कधी आखाडा पहिला नाही, त्याचा सल्ला घेऊन तुम्ही पैलवान होऊ शकत नाही. एखाद्या मूर्खाने स्तुती केली, तर त्यानेही हुरळून जायचे कारण नाही. स्तुती किंवा निंदा कोण करतो, हे तपासा. त्याचा खरंच अधिकार असेल, तर त्याच्या म्हणण्याला मान द्या. अन्यथा तुमचं मन मेल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा आत्मा मरतो, तो जिवंत असूनही जिवंत नसतो. लोकांचे मत जरूर ऐका, पण त्याचा नकारात्मक परिणाम मनावर होऊ देऊ नका. माऊली म्हणतात, देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - 9921816183
ऐकावे जनाचे करावे मनाचे, listen yourself
ऐकावे जनाचे करावे मनाचे 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या